निसर्ग त्यांना कळला हो

07 Nov 2018

सिक्कीम… भारताच्या ईशान्य सीमेवर असलेलं राज्य. भारतातील पहिले ‘सेंद्रिय’ राज्य. तसं ह्या राज्याला आपल्या भौगोलिक रचनेमुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्याच्या तीन दिशांना चीन आणि भूतान हे देश पसरलेले. चीनच्या शेजारामुळे बऱ्याचदा चर्चेत राहिलेलं असं हे राज्यं. पण खरं सांगायचं तर निसर्गदेवतेने आपल्या रंगांची इथे मुक्तहस्ते उधळण केली आहे. सिक्कीम राज्याचे राज्यपाल मा. श्रीनिवासजी पाटील ह्यांनी सुचवल्यामुळे माझा ह्या राज्याला भेट देण्याचा योग्य आला. तसा त्यांच्या सांगण्यावरून गंगटोक भेटीचा योग अगोदरच आला होता. पण सिक्कीम मधील इतर ठिकाणांना मी भेट द्यावी आणि तेथील इको टुरिझम पाहावे असे त्यांनी सुचवले. आणि मी ह्या नंदनवनात प्रवेश केला.

तसं बघायला गेलं तर बहुतेक पर्यटक सामान्यतः पूर्व सिक्कीम म्हणजेच गंगटोक आणि उत्तर सिक्कीम म्हणजे ला चुंग वगैरे ठिकाणांना मोठ्या प्रमाणावर भेटी देतात. पण पश्चिम सिक्कीम मध्ये असलेली ओखरे, बारसे आणि यक्सम हि ठिकाणं म्हणजे अलौकिक निसर्ग सौंदर्याचा नमुनाच म्हणायला हरकत नाही. ह्यातील बारसे आणि यक्सम हि होम स्टे ची सुविधा पुरवणारी गावं.

सभोवताली पसरलेलं दाट जंगल, विपुल प्रमाणावर असलेले धबधबे आणि असंख्य प्रमाणावर असलेली पक्ष्यांची विविधता हे यक्सम चे वैशिष्ट्य.  बागडोगरा पासून सुमारे ६ तासांवर असलेल्या ह्या गावातून ‘कांचनजंगा’ राष्ट्रीय उद्यानाकडे जाण्याचा मार्ग आहे. नैसर्गिक विविधतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ह्या गावाला परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात आणि ‘लकपा तेनझिंग’ सारख्या अत्यंत निष्णात स्थानिक मार्गदर्शकाबरोबर इथल्या निसर्गाचा अभ्यास करतात. ट्रेकिंग, हायकिंग आणि पक्षी निरीक्षण असं सगळंच तुम्हाला इथे करता येऊ शकतं. Scarlet Finch, Kalij Pheasant, Yellow Browed Fantail Flycatcher, White Tailed Nuthatch, इ. प्रकारचे अनेक पक्षी इथे तुम्हाला दिसतील. थोडक्यात सांगायचं तर एखाद्या निसर्गवेड्याला खुणावणारं असं हे गाव आहे. ‘लिंबू’ समाजाच्या इथल्या स्थानिक लोकांकडे पाहिलं कि आपल्या लक्षात येत कि ह्या लोकांचा ‘वाल्याचा वाल्मिकी झाला आहे.’ पूर्वी शिकार करणारे त्यांचे हात आता निसर्ग संवर्धनाचं काम करत आहेत. निसर्गदेवतेची मर्जी संभाळल्याशिवाय आपला टिकाव लागणार नाही हे त्यांना नेमकं उमगलं आहे. आपल्या पोटापाण्यासाठी पूर्वी निसर्गाचा ऱ्हास करणारे हेच लोक खऱ्या अर्थाने निसर्गाचे रक्षक बनले आहेत. इथल्या घरांतील अगदी छोटा मुलगा सुद्धा उत्तम पक्षी निरीक्षक आहे. एखादा पर्यटक इथल्या एखाद्या होम स्टे मध्ये राहिला कि त्याला त्याच्या वास्तव्यात वेगवेगळ्या प्रकारच्या २४ पर्यटन उपक्रमांचा अनुभव हे स्थानिक लोक देतात. ‘अतिथी देवो भव’ हि आपली परंपरा खऱ्या अर्थाने जोपासणारे हे गाव आहे.

यक्सम पासून ५ तासांच्या अंतरावर ओखरे गाव आहे. हे गावही असच निसर्गसौंदर्याने नटलेलं. बारसे गावाची मजाही अशीच. ह्या गावात बारसे अभयारण्य आहे. ‘रोडोडेंड्रॉन’ ह्या एप्रिल महिन्यात फुलणाऱ्या वनस्पतींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य. ह्या वनस्पतीपासून स्थानिक लोक सरबत आणि दारू बनवतात. वनउपजांचा पाहिजे तेवढाच वापर येथील लोकांकडून होतो. ह्या अभयारण्यात ४ ते ४.५ किमीचा ‘नेचर ट्रेल’ आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने तयार केलेला असा हा नेचर ट्रेल. साधारण प्रत्येक १-१.५ किमीच्या अंतरावर बसण्याची सोय केलेली आहे. ह्याच्या शेवटच्या भागात पोहोचलो कि कांचनजंगा शिखराचे सुरेख दृश्य आपल्याला  दिसते. नजरेचा आणि शरीराचा दोन्हीचा क्षीण घालवणारे असेच हे दृश्य आहे. ह्या अभयारण्यातही  पक्ष्यांच्या विविधतेची अगदी रेलचेल आहे. Black Faced Laughing Thrush, Spotted Laughing Thrush, White Browed Fulvetta असे अनेक पक्षी आपल्या स्वागताला असतात. ओढ्यांच्या बाजूने आढळणारे Brown Dipper आणि Forked Tail ह्यांसारखे पक्षी उत्तम ओढे आणि पाणीसाठ्याची चिन्ह दर्शवितात. सिक्कीम राज्याचा राज्यप्राणी असणारा ‘रेड पांडा’ इथे मोठ्या संख्येने आढळतो. आम्हालाही जवळपास दीड तास त्याने दर्शन दिले.

पृथ्वीवरील ह्या नैसर्गिक स्वर्गाचे महत्त्व इथल्या लोकांनी अचूकरीत्या जाणले आहे. भारताच्या शिरपेचात खोवलेल्या ह्या निसर्गरूपी  तुऱ्याची देखभाल इथल्या प्रशासनाकडून अगदी व्यवस्थित राखली जाते. राज्यात जवळपास प्रत्येक गावात इको डेव्हलपमेंट कमिटी स्थापन केलेल्या आहेत. ह्या कमिटीचे कामकाजही अत्यंत सुसुत्रतेने सुरु असते. आपले निसर्गावर असलेले अवलंबित्व इथल्या लोकांनी ओळखले आहे. निसर्गाला न ओरबाडता  निसर्गाचा हात धरून त्याने ठरवून दिलेल्या वाटेवर चाललो तरच आपली प्रगती होऊ शकेल हे त्यांना समजलं आहे. मी आपल्या राज्याची आणि सिक्कीम ची तुलना करू इच्छित नाही. प्रत्येक राज्याची वैशिष्ट्य आणि बलस्थानं  वेगवेगळी असतात.  पण  त्यांच्या इको डेव्हलपमेंट कमिटीनी राबविलेल्या अनेक चांगल्या गोष्टी अनुकरणास पात्र आहेत.

अत्यंत सुंदर, स्वच्छ आणि आम्हा पुणे-मुंबईच्या लोकांना सर्वाथाने ‘मोकळा श्वास’ घ्यायला शिकवणारे असे हे राज्य. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं इथे आल्यावर नव्याने कळतं. आपल्याला सर्वाथाने निसर्गाच्या जवळ नेणारे हे राज्य म्हणजे ‘जरूर पहावे असे काही’ असे आहे. स्वर्ग केवळ दोन बोटे उरणाऱ्या या भूलोकीच्या स्वर्गाला प्रत्येकाने भेट द्यायलाच हवी.

 

अनुज सुरेश खरे

                                                 मानद वन्यजीव रक्षक, पुणे

                                         सदस्य, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ 

                                        (शब्दांकन – ओंकार पांडुरंग बापट)