निसर्गाय नमः॥

29 Nov 2018

पहाटेची वेळ होती. अंधुक अंधुक दिसू लागलं होतं. शर्वरीचा अंधार भेदत उगवत्या सूर्याचे किरण गगनपटलावर सुरेख नक्षी मांडत होते. नागझिरा अभयारण्यातील ती सुरेख सकाळ मला वेगळीच भुरळ घालत होती. ‘मधुकुंज’च्या व्हरांड्यातून समोर दिसणारं विस्तीर्ण तळं ह्या सौंदर्यात अधिकच भर घालत होतं. तळ्यातल्या पाण्यावर निर्माण होणाऱ्या हळुवार लाटा मोहक दिसत होत्या. दिवसभराच्या उमेदवारीसाठी तयार होणाऱ्या पक्ष्यांचा पहाटेचा रियाज नुकताच सुरु होत होता. स्वर्गातल्या वातावरणाची आठवण करून देणाऱ्या त्या जंगलातल्या क्षणांमुळे माझी ब्रह्मानंदी टाळी लागली होती. आणि मग नकळतच मनात विचारांच्या लाटा उसळू लागल्या. निसर्ग आणि आपलं नेमकं नातं काय? आपण त्याच्याकडून काही शिकलो की नाही? आपल्याला सतत सढळ हस्ते काही ना काही देणाऱ्या निसर्गाला आपण काय दिलं? मला निसर्ग का आवडतो? अशा असंख्य प्रश्नांनी मनात गर्दी केली होती.

मला वाटतं, आपलं निसर्गाशी एक खास नातं आहे. कधी तो आपला गुरु असतो, कधी तो आपला सखा असतो. कधी मायेने सांभाळ करणारी आई असतो, तर कधी अनुभवांनी जगाचे टक्केटोणपे शिकवणारा बाप. आपण ज्या चष्म्यातून त्याच्याकडे बघू तसा आपल्याला सापडणारा हा निसर्ग. निसर्गावर प्रेम करणारा मनुष्यप्राणी न सापडणे विरळाच. अगदी लहानपणापासून आपल्याला निसर्गाची ओढ असतेच. अगदी वृद्धापकाळातही निसर्ग आपल्याला बालपणाची आठवण करून देतो. म्हातारपण विसरायला लावतो. म्हणूनच प्रत्येकाचं निसर्गाशी आपलं स्वतःचं असं नातं आहे. निसर्गात माणूस त्याचं वय, समाजातील स्थान, आर्थिक स्थिती, सगळं सगळं विसरतो. अगदी लहान मुलाला आपण जरा एकट सोडलं की आपल्या इवल्या डोळ्यांनी सभोवतालचा निसर्ग मनोसक्त पिण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्याला त्याचा अर्थ समजत नसला तरीही. मोठे झाल्यावर तर आपल्या निसर्गाबद्दलच्या विचारांना वेगळे आयाम मिळतात. जसजसं वय वाढत जाईल तसतसं आपले निसर्गाबद्दलचे विचार आणि त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते.

मी गेली २२ वर्ष निसर्गात भटकतोय. मी माझ्या स्वतःच्या बाबतीत जरी विचार केला तरी मला निसर्गाने बऱ्याच गोष्टी शिकवल्या. अगदी मुंगीपासून ते हत्तीपर्यंत मी निसर्गाच्या प्रत्येक घटकाकडून काहीतरी शिकलो आहे. मुंग्या आपल्याला कठीण परिश्रमांचं मोल शिकवतात. पाण्यात एका पायावर उभा राहून तपश्चर्या केल्यासारखी आपल्या भक्ष्याची वाट पाहणारा बगळा आपल्या संयमाचं महत्त्व पटवतो. समूहाने शिकार करण्यात तरबेज असणारे रानकुत्रे आपल्याला एकसंघ होऊन काम करण्याची शिकवण देतात तर उंच अवकाशात वावरणारे फ्लेमिंगो पक्षी एकमेकांमध्ये असलेला समन्वय दाखवून देतात. पावलापावलाला भूमी पादाक्रांत करणारा वाघ आपल्याला स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याचं शिक्षण देतो तर स्वतःचं कुटुंब सांभाळून राहणारे हत्ती एकमेकांबद्दल घ्यायची काळजी दर्शवतात.

इतकं सगळं असूनही मग आपल्यात आणि निसर्गात अजूनही छान नातं का बरं निर्माण होऊ शकलं नाही? माणूस पृथ्वीतलावरचा सर्वात हुशार प्राणी. आपल्या हुशारीने आपण विविध गोष्टी आत्मसात केल्या. जीवन सुखकर होण्यासाठी असंख्य गोष्टींचा शोध लावला. अवकाश पालथ घातलं. अगदी पृथ्वीच्या आणि ह्या अवघ्या विश्वाच्या उत्पत्तीच्या मुळाशीही आपण जाऊन पोहोचलो. पण ह्या वाटचालीत आपलं सखा, सोबती, वाटाड्या असणाऱ्या निसर्गाची कास मात्र सुटत चालली. माणूस स्वार्थी बनला. माणूस सोडून इतर प्राणी, पक्षी, कीटक त्याला हीन दर्जाचे वाटायला लागले. त्यांच्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन बदलायला लागला. आपलं संपूर्ण जग फक्त आणि फक्त मानवजातीच्या भोवती केंद्रीत झालं. मनातून आपण स्वतःला निसर्गातील इतर सजीव, निर्जीव घटकांपासून वेगळं केलं. मनातून वेगळे झालोच होतो. त्यानंतर आपण जंगलांना सीमा आखल्या, कुंपण घातलं. निसर्गाला आपण असं अडवून ठेऊ शकत नाही हे आपल्या लक्षातच आलं नाही. आपला रोजचा चष्मा बाजूला सारून जरा नीट निसर्गाकडे पाहिलं तर आपल्या हे लक्षात येईल की माणसाबरोबरच इतर प्राणी, पक्षीही हुशार आहेत. आपलं दैनंदिन जीवन जगताना त्यांच्या भावनांच्या अनेक छटा, अनेक कंगोरे आपल्याला दिसतील. त्यांना बोलता येत नसलं तरीही ते अनेक प्रकारांनी आपल्या भावना व्यक्त करत असतात.

सर्वात मुख्य म्हणजे माणूस सोडून निसर्गातील इतर सर्व घटक निसर्गाने घालून दिलेल्या नियमांना धरूनच वागतात. स्वार्थी वृत्ती ही जीवनाला अधोगतीकडे नेते. पण आपण अगदी आपल्या परीसंस्थेतील सर्वोच्च घटकाचे म्हणजेच वाघाचे जरी उदाहरण घेतले तरी आपल्या हे लक्षात येईल की प्राणी निसर्गाच्या नियमांचं किती काटेकोरपणे पालन करतात. भूक लागेल तेव्हाच शिकार करणे हा मांसाहारी प्राण्यांचा स्थायीभाव आहे. किंबहुना निसर्गाने आपला समतोल राखून ठेवण्यासाठी घातलेला तो नियम आहे. मी अनेकदा चीतळांच्या कळपाशेजारून शांतपणे जाणारा वाघ पहिला आहे. अशा वेळी भूक लागलेली नसल्याने तो त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही.

आपल्या पूर्वजांनी आपल्या अनुभवानुसार खूप चांगल्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. बहुतेक वेळा त्या निसर्गाचा आधार घेऊनच सांगितल्या आहेत. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे की अंथरूण पाहून पाय पसरावेत. आपली ऐपत असेल, आपल्याला झेपेल ह्याचप्रमाणे बोलावं, वागावं. आपण मात्र कधीही हे लक्षात घेत नाही. किंबहुना आपल्याला तो कमीपणा वाटतो. आणि मग आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो. एखाद्या पक्ष्याचं उदाहरण बघा. एखाद्या ठिकाणी दुष्काळ पडला असेल, खायला मुबलक उपलब्ध नसेल तरी पक्षी त्या हंगामाची वीण थांबवतात.

प्राण्यांना त्यांच्या भावना कधीच लपवून ठेवता येत नाहीत. आईचं आपल्या पिल्लाबद्दल असेलेलं प्रेम वादातीत आहे. कुठल्याही प्राणी पक्ष्याच्या आईकडून आपल्या पिल्लाच संगोपन भाव ओतून केलं जातं. तुम्ही धनेश पक्ष्याचं उदाहरण घ्या. धनेश पक्ष्यातली मादी, पिल्लांना जन्म देण्याआधी ढोलीत स्वतःला बंद करून घेते. अंडी उबवणे, पिल्लं बाहेर आल्यावर त्याचं संगोपन करणे, घरट्याची नियमित साफसफाई करणे ही कामं ती ढोलीत राहून करते. तितकच कौतुक नर धनेश पक्ष्याचं आहे. जितके दिवस मादी ढोलीत राहते तितके दिवस ती तिच्या अन्नासाठी पूर्णपणे नरावर अवलंबून असते. मादी ढोलीच्या बाहेर येईपर्यंत, नर धनेश पिल्लांबरोबरच मादीलाही अन्न पुरवतो आणि पिल्लं आणि मादी ह्यांची काळजी घेतो.

मार्जारकुळामध्ये तर आईने शिकवल्याशिवाय पिल्लांना त्यांच्या पुढील आयुष्यात शिकार करता येत नाही. आईजवळ असेपर्यंत पिल्लं संपूर्णपणे आईवर अवलंबून असतात. ह्या काळात त्यांच्यामध्ये असलेलं प्रेम पाहण्यासारखं असतं. वाघांच्या अशा आई आणि पिल्लांचं निरीक्षण करण्यात मी अनेक वेळा तासन तास घालवले आहेत. पिल्लांचं एकमेकांबरोबर खेळणं, आईच्या अंगावर उड्या मारणं, आईचं अनुकरण करणं, आईने त्यांची काळजी घेणं हे पाहण्यात जो आनंद मिळतो त्याची तुलना इतर कोणत्याही गोष्टीशी करता येणार नाही. वाघांमध्ये आईने आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी तिच्यापेक्ष्या जास्त ताकदीच्या नराशी दोन हात केल्याचं उदाहरणही आहे.

प्राण्यांमध्ये एक वृत्ती अगदी सहजतेने आढळून येते ती म्हणजे सावधता. चीतळं अगदी मोकळ्या मैदानात चरत असली तरी कमालीची सावध, चौकस असतात. कोणताही धोका दिसला, जाणवला तरी आपल्या इतर बांधवांना सावध करण्याचं काम ती चोख करतात. अशी सावधता बाळगली तरच आपण टिकून राहू शकू, जगू शकू हे त्यांना पक्कं माहित असतं. आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये आवश्यक बदल करण्याची कला प्राण्यांनी उत्तम राखली आहे. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत स्वतःला ढाळून घेण्याच्या क्रियेत माहीर असणारा बिबट्या त्याचं उत्तम उदाहरण आहे. असे बदल केले नाहीत तर आपली जात टिकून राहणार नाही, ती नामशेष होईल हे प्राण्यांना उमजलं आहे.

निसर्गाकडे बारकाईने पाहिलं की आपल्या लक्षात येईल की घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे. निसर्ग आपल्याला वर्तमानपत्रासारखा वाचता यायला हवा. ती दृष्टी घेऊनच आपण कायम निसर्गात फिरलं पाहिजे. ते खरं निसर्ग पर्यटन आहे. आजकाल निसर्ग पर्यटन म्हणजे केवळ आकर्षण, वेड बनलं आहे. निसर्गात फिरताना इथे पूर्वी राहत असलेल्या बैगा, गोंड सारख्या आदिवासींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. निसर्गाच्या समतोलाला कोणत्याही प्रकारचा धक्का बसणार नाही ह्याची काळजी त्यांच्याकडून पुरेपूर घेतली जात असे. आज हेच लोक आपले खरे मार्गदर्शक आहेत. आज जंगलाबाहेर स्थाईक झालेल्या ह्या लोकांना सोबत घेऊन, त्यांचा आधार घेऊन, त्यांनाही फायदा होईल आणि निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही ह्याची काळजी घेऊन केलेलं पर्यटन हीच जबाबदारपणे केलेली भ्रमंती म्हणायला हवी. आणि तेच शाश्वत पर्यटन आहे.

निसर्गात फिरताना निसर्ग आपल्याला आरसा दाखवतो. आपण जसं त्याच्याकडे बघू तसं त्याचं रूप आपल्याला दिसतं. अगदी ग. दि. माडगुळकरांनीही म्हणून ठेवलं आहे, “बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु; झाडे, वेली, पशू, पाखरे यांशी दोस्ती करू.” शेवटच्या ओळीत ते म्हणतात, “भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पऱ्ह्यात पोहू; मिळेल तेथून घेऊ विद्या अखंड साठा करू” निसर्गाचं देणं सढळ हस्ते स्वीकारणं हीच खरी आपली गरज आहे. जगा आणि जगू द्या हा निसर्गनियम लक्षात ठेऊन आपण वागलो तरच आपण आपली मानवजात टिकवू वाचवू शकू. निसर्गाला गुरु, सखा मानून त्याच्याबरोबरीने आपण चाललो तरच आपलं भविष्य उज्ज्वल आहे. अन्यथा विनाश अटळ आहे.

माझ्या डाव्या बाजूने अचानक आलेल्या एका आवाजाने माझी तंद्री भंगली. कुऽऽ‌‍क… कुऽऽक…. निलय विश्रामगृहाच्या बाजूने येणारा चीतळांच्या आवाजाचा निनाद कानावर पडत होता. वाघ अथवा बिबट्याच्या अस्तित्वाची ती खूण होती. किती विचार माझ्या मनात डोकवून गेले होते. माझ्या जीवनाला अर्थ देणाऱ्या निसर्गाच्या सहवासात माझे विचार मी कागदावर उतरवायला घेतले. आणि तोच चीतळांच्या धोक्याच्या सूचनांना भेदणारा जंगलाच्या राजाचा, वाघाचा आवाज आसमंतात दणाणला. आहुमऽऽऽ आहूऽऽऽम आहुमऽऽऽ….

                                                                                                                                                                        अनुज सुरेश खरे

                                                 मानद वन्यजीव रक्षक, पुणे;

                                         सदस्य, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ 

                                        (शब्दांकन – ओंकार पांडुरंग बापट)