अरण्यभान

13 May 2020

(सदर लेख दै. महाराष्ट्र टाईम्स मध्ये ११ एप्रिल २०२० रोजी छापून आला होता)

साधारणतः फेब्रुवारी महिना उजाडला की निसर्ग पर्यटन सेवा पुरवणाऱ्या संस्थांची लगबग सुरु होते. एप्रिल-मे महिन्याच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीत अनेक लोकं जंगलात जाण्याचा पर्याय हल्ली चोखाळायला लागले आहेत. अनेक व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य यांचे बुकिंग चार महिने अगोदर सुरु होते. त्यामुळे फेब्रुवारी महिना आला की सर्वांचीच लगबग सुरु होते. पण या वर्षी मात्र जगभरातच कोरोनाने हाहाकार उडवला आहे. अवघ्या जगाच्या तोंडचे पाणी पळवले आहे. पर्यटनाला सुगीचे दिवस असणाऱ्या या काळातच भारतातील सगळं निसर्ग पर्यटन कोरोनाला अटकाव करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ठप्प झालं. अर्थात हा लॉकडाऊन ही आत्ताच्या परिस्थितीची आत्यंतिक गरज आहे. पण या परिस्थितीमुळे या निसर्ग पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक लोकांची आणि उद्योगांची आर्थिक घडी विस्कटली आहे. या सगळ्याचा आढावा घेण्यासाठीच हा लेखनप्रपंच.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस अनेक जंगलामध्ये सुरुवातीला पर्यटन सुरु होतं. परदेशी पर्यटक तुरळक होते. अनेक लोकं या काळात पर्यटन रद्द करण्यावर भर देत होते. या काळात वास्तविक पाहता टूर ऑपरेटर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. अनेक टूर ऑपरेटर्स लोकांना पर्यटन रद्द करण्यासाठी सहकार्य करत होते. पण काही मात्र अडवून ठेवत होते. पण अखेर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य वन विभागाने जंगलं पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि ही कोंडी  फुटली. यात अनेकांचे नुकसान झाले आहे हे खरे आहे. पण पर्यटन बंद झाले नसते तर हा रोग वेगाने सर्वत्र पसरला असता. सध्या तरी या रोगावर घरीच थांबणे हा एकमेव उपाय आहे. पर्यटन बंद झाल्यामुळे या निसर्ग पर्यटनावर अवलंबून असणारे जिप्सी चालक, जवळपासच्या हॉटेलमध्ये काम करणारे स्थानिक लोकं, होम स्टे सारख्या सुविधा पुरविणारी मंडळी, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अशा अनेक लोकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. या सगळ्यात सर्वात मोठी अडचण ही गाईड्सची. निसर्ग संरक्षण  आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे व्हावे यासाठी वन विभागाने स्थानिक लोकांना यात सहभागी करून घेण्यास सुरवात केली. आणि या स्थानिक लोकांना गाईड होण्याची संधी दिली. पण हे लोकं काही वन विभागाचे कर्मचारी नाहीत. त्यामुळे त्यांना काही मासिक वेतन मिळत नाही. सफारीला गेल्यावर त्यांना वन विभागाने निश्चीत केलेली ठराविक रक्कम मिळते. पण पर्यटन बंद झाल्यामुळे त्यांना मिळणारा हा मोबदला बंद झाला आहे.

सध्या महाराष्ट्र राज्य वन विभागाने ३० एप्रिल पर्यंत हे पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या या लोकांना मदतीची जास्त गरज आहे. परदेशी लोकांच्या पर्यटनाचा विचार केला तर येणाऱ्या काळात या परदेशी पर्यटनाला फार मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. देशाच्या अनेक व्याघ्र प्रकल्पात मोठ्या संख्येने दिसणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या येत्या एक-दोन वर्षात कमालीची रोडावणार आहे. अनेक संस्था या गाईड्स च्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. पण सर्व टूर ऑपरेटर्सनी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. सध्याची एकंदर परिस्थिती पाहता जंगलं पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा निर्णयच शहाणपणाचा आहे. सध्या आपल्यासमोर असलेली लढाई मोठी आहे. जंगलं ३० एप्रिलनंतर सुरु होणार का? का नाही सुरु होणार? या हातावर पोट असणाऱ्या माणसांचं काय? बाकी उद्योगधंद्याचं काय? हे आणि इतर असे अनेक प्रश्न सध्या गौण आहेत. देशाचा सुजाण नागरिक या नात्याने आपणही शासनाला सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ या उक्तीप्रमाणे आपण जर सुरक्षित राहिलो तरच पुढे आपल्याला काहीतरी मार्ग काढता येईल.

या व्याघ्र प्रकल्पाच्या आसपास स्थिती काही वेगळी नाही. अनेक गावांच्या सीमा गावकऱ्यांनी काळजीपोटी बंद केलेल्या आहेत. या गाईड्सनी त्यांच्यासमोर आलेली ही परिस्थिती स्वीकारली आहे. किंबहुना शहरापेक्षा जास्त काळजी या गावांमधून घेतली जात आहे. त्यांच्याही मनात एक विचार आहे की आत्ता पर्यटन सुरु झाले आणि पर्यटक इथे येऊ लागले किंवा आपल्यापैकी कोणी कामाला मोठ्या शहरात गेला आणि त्यांच्याकरवी आपल्याकडे हा भयानक रोग आला तर आपल्या सर्वांच्या तोंडचं पाणीच पळेल. त्यामुळे आत्ता हा व्यवसाय बंद ठेऊन घरीच राहणे शहाणपणाचे ठरणार आहे. गावात कोणी मोठ्या सहरातून आला असेल तर शासनाला माहिती देण्यासाठी हे लोकं स्वतःहून पुढे येत आहे. या लोकांनी आपलं सामाजिक कर्तव्य जाणलं आहे. हे लोकं आपल्या घराबाहेर पडणेही टाळत आहेत. फक्त या लोकांमध्ये काही लोकं असे आहेत ज्यांचं पोट केवळ पर्यटनावर अवलंबून आहेत. त्यांच्याजवळ शेतीचाही पर्याय नाही. त्यामुळे त्यांना किमान पुढचे तीन महिने काही काम मिळावे अशी त्यांची वनविभागाकडून अपेक्षा आहे.

या सगळ्यात जंगलातील वन्यजीवांचाही विचार होणे गरजेचे आहे. न्यूयॉर्क शहरातील प्राणीसंग्रहालयातील एका वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. या रोगाचा परिणाम या वन्यजीवांवर कसा होतो याची आपल्याला सध्यातरी काहीच माहिती नाही. नॅशनल टायगर कॉन्सर्व्हेशन अथॉरीटी या सर्व व्याघ्र प्रकल्पांवर अंकुश ठेवणाऱ्या केंद्रीय संस्थेने सर्व व्याघ्र प्रकल्पांना पत्र लिहून वाघांवर कॅमेरा ट्रॅपद्वारे लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. या वन्यजीवांची काळजी घेणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. या भयानक रोगाच्या भस्मासुराला नष्ट करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. आणि यासाठी आपण घराबाहेर न पडणे आणि सोशल डीस्टंन्सिंग राखणे हेच गरजेचे आहे.    

वन्यजीव आणि त्यांची ओळख आपल्याला करून देणारे गाईड्स या दोघांचाही विचार हेच आजचे आपले अरण्यभान असणार आहे. पुन्हा पर्यटनाला सुगीचे दिवस येतील. पुन्हा प्रत्येक जंगलात कॅमेऱ्यांच्या क्लिक्सचा खडखडाट ऐकू येईल. पुन्हा जंगलातील पक्ष्यांचे सुमधुर आवाज कानावर येतील. पुन्हा वाघाची डरकाळी कर्णयुग्मांना मुग्ध करेल. त्याची राजबिंडी डौलदार चाल डोळ्याचे पारणे फेडेल. पण आत्ता आपल्याला संयम राखण्याची नितांत आवश्यकता आहे. आपला आणि इतरांचा जीव आतताईपणा करून धोक्यात घातला तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. या घडीला वर्तमानापेक्षा भविष्याचा विचार करण्याची गरज जास्त आहे. भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न कै. अटल बिहारी वाजपेयीजींच्या ओळी मला या वेळी आठवतायत.

हम पडाव को समझे मंजिल

लक्ष्य हुआ आंखोंसे ओझल

वर्तमान के मोहजाल में-

आनेवाला कल न भुलाएँ ।

आओ फिर से दिया जलाएँ ।

श्री. अनुज सुरेश खरे

श्री. ओंकार पांडुरंग बापट

फोटो – अर्पित दुबे